नवी दिल्ली : नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे यशस्वी, क्रांतीकारी महिलांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असताना संरक्षण क्षेत्रातूनही एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर येत आहे. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत मंगळवारी सुखोई-३० लढाऊ विमानाचं महिला वैमानिकाने उड्डाण केलं. आसाममधील भारत-चीन सीमेवर तेजपूर येथील पूर्व सेक्टरमधील फॉरवर्ड बेसवरून सुखोई ३० विमानानं उड्डाण घेतलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फ्लाईट लेफ्टनंट तेजस्वी यांनी वेपन सिस्टम ऑपरेटिंग केलं आहे. वेपन सिस्टम ऑपरेटिंग करणाऱ्या तेजस्वी या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
वेपन ऑपरेटर फ्लाइट लेफ्टनंट तेजस्वी म्हणाल्या की, ‘काही हुशार महिलांनी पारंपारिक मर्यादा तोडल्यामुळे आम्ही आमची स्वप्ने पूर्ण करू शकतो. त्यामुळे आम्ही आता स्वच्छंदी झालो आहोत. महिलांनी फायटर जेट उडवणं नवीन गोष्ट नाही. हवाई दलात प्रत्येक पुरुष आणि महिला समान कठोर परिश्रम करत असतो आणि त्यांना समान प्रशिक्षण दिलं जातं. आम्ही येथे समान पातळीवर काम करतो. त्यामुळे पूर्वेकडील क्षेत्रात आमचे पायलट कोणत्याही प्रसंगाला प्रत्युत्तर देण्यास तयार आहेत.’