येस न्युज नेटवर्क : फुटबॉलचा विश्वचषक अर्थात फिफा वर्ल्ड कप सध्या सुरु असून ग्रुप स्टेजनंतर राऊंड ऑफ 16 आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपून सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. एकूण 32 संघानी सहभाग घेत सुरु झालेल्या या स्पर्धेत आता केवळ चार संघ राहिले आहे. चार संघासह आता केवळ चार सामने यंदाच्या विश्वचषकात खेळायचे बाकी आहेत. अशा परिस्थितीत गोल्डन बूट पुरस्कारासाठी काही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. वर्ल्ड कप 2022 मध्ये तीन खेळाडूंनी कमाल कामगिरी करत गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी चुरस वाढवली आहे.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जात असून यंदा या शर्यतीत तीन खेळाडू आहेत. यामध्ये फ्रान्सचा कायलिन एम्बापे ऑलिवर जिराऊड आणि अर्जेंटिना संघाचा लिओनल मेस्सी यांचा समावेश आहे. या तिघांमध्ये गोल्डन बूट पुरस्कारासाठी फ्रान्सचा एम्बापे आघाडीवर आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 5 गोल केले आहेत. तसंच फ्रान्सच्या जिराऊडनेही 4 गोल केले आहेत. तो देखील या शर्यतीत आहे. त्यात आता फ्रान्स सेमीफायनल खेळणार असल्याने कायलिन आणि जिराऊडच्या गोल्सची संख्या आणखी वाढू शकते.
फ्रान्सचा सेमीफायनलचा सामना 15 डिसेंबरला मोरोक्कोविरुद्ध होणार आहे. या यादीत तिसरं नाव म्हणजेच महान फुटबॉल लिओनल मेस्सी. मेस्सीने 4 गोल आतापर्यंत केले असून तो या दोन्ही फ्रेंच खेळाडूंना मागे टाकू शकतो. अर्जेंटिना संघाचा आगामी सामना 14 डिसेंबरला क्रोएशियाविरुद्ध होणार आहे.