श्री क्षेत्र तुळजापूर (जि. धाराशिव) येथील तुळजाभवानी मंदिर समितीकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी (व्हीआयपी) असलेल्या मोफत दर्शन पासची सुविधा तूर्तास रद्द करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी वगळता, अन्य व्हीआयपींना देवीच्या दर्शनासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
तुळजाभवानी मंदिर समितीच्या माध्यमातून मुखदर्शन, धर्मदर्शन आदी पद्धतींच्या दर्शनाची व्यवस्था आहे. भाविकांना रांगेत थांबून तुळजाभवानी देवीचे दर्शन घेता येते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. कमी वेळेत देवीचे गाभार्याजवळून दर्शन व्हावे याकरिता देणगी देवून दर्शनाची सुविधाही मंदिर समितीने सुरू केली आहे. २०० रुपये प्रतिव्यक्ती याप्रमाणे त्यासाठी भाविकांकडून शुल्क आकारले जाते. काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी मंदिर समितीने विशेष कोटा निर्धारित केला होता. त्यानुसार देवी दर्शनासाठी राज्यभरातून आणि देशभरातून येणार्या भाविकांपैकी अतिमहत्त्वाच्या भाविकांना व्हीआयपी पासची सुविधा नि:शुल्क दिली जात होती. या सुविधेला तूर्तास पूर्णविराम देण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली मंदिराचा कारभार चालविला जातो. त्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार, अधिकारी, आमदार आदींचा समावेश आहे. या प्रत्येकांसाठी व्हीआयपी पासचा स्वतंत्र कोटा निर्धारित करण्यात आला आहे. दररोज १७५ व्हीआयपींना तुळजाभवानी देवीचे नि:शुल्क दर्शन घेता यावे, अशा पद्धतीने हा कोटा निर्धारित करण्यात आला होता.
आठ जणांमध्ये १७५ व्हीआयपी पास विभागून दिले जात होते. स्थानिक पुजारी, विविध संस्था आणि सर्वसामान्य भाविकांमधून तक्रारी समोर आल्यामुळे मागील आठ दिवसांपासून व्हीआयपी दर्शन पासची सुविधा तूर्तास बंद करण्यात आली असल्याची माहिती तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिली.