मुंबई : पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. गुरुनानक जयंतीनिमित्त आज पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. मोदींनी नवीन कृषी कायदे रद्द करीत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गेल्या दीड वर्षात 450 च्या आसापास शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले
गेल्या दीड वर्षापासून देशातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरियाणाचा शेतकरी तीन कृषी कायदे, काळे कायदे याविरुद्ध संघर्ष करतोय, आंदोलन करतोय. सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठीपणाची होती. काही झालं तरी झुकणार नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. या संपूर्ण काळात 450 च्या आसापास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले,आत्महत्या झाल्या. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलं. लाठ्याकाठ्या वापरण्यात आल्या. प्रचंड दबावाचं राजकारण करण्यात आलं. शेतकऱ्यांना आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी अशा प्रकारच्या बाधा देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती की देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिल्या आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले, असे संजय राऊत म्हणाले.