येस न्युज मराठी नेटवर्क : दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाची हमी मिळावी यासाठी उसाप्रमाणे दुधाला एफ.आर.पी. चे संरक्षण मिळावे व दूध आणि दुग्ध पदार्थांच्या निर्मितीमध्ये तयार होणाऱ्या नफ्यात शेतकरी कुटुंबांना रास्त वाटा मिळावा यासाठी दूध क्षेत्राला रेव्हेन्यू शेअरींगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागण्यांसाठी देशस्तरावर संघर्ष व संघटन उभे करण्याचा निर्णय केरळमध्ये कन्नूर येथे संपन्न झालेल्या शेतकरी नेते व कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.
विविध संघटना, नेते, कार्यकर्ते व प्रगतिशील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून आंदोलनाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात गेले चार वर्ष सुरू आहे. आता अशाच प्रकारचे प्रयत्न देशस्तरावर सुरू झाले असल्याचे नवले यांनी सांगितले. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व सरचिटणीस हन्नन मोल्ला यांच्या सहकार्याने देशस्तरावरील सर्व प्रमुख दूध उत्पादक राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक केरळमध्ये कन्नूर येथे दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाली.