मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये. त्यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता महापालिका निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार हे आता स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मिशन मुंबई सुरु केल्याची घोषणा केली तसंच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला खात्री आहे या कार्यकारिणीच्या काळात मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी असं फडणवीसांना वाटणं साहजिकच आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेसोबत आहे तोपर्यंत भाजपाचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.