येस न्युज मराठी नेटवर्क । देशातील चारचाकी वाहनधारकांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून चारचाकी वाहनधारकांना फास्टॅग (FASTag) लावण्यासाठी 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यापूर्वी प्रत्येक चारचाकी वाहनासाठी 1 जानेवारीपासून FASTag बंधनकारक असेल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. एक जानेवारीपासून देशातील टोल नाक्यांवर कॅश व्यवहार होणार नाहीत, फक्त FASTag ग्राह्य धरले जाईल असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जाहीर केले होते. पण, आता FASTag साठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
15 फेब्रुवारी 2021 पासून प्रत्येक चारचाकी वाहनाला FASTag बंधनकारक असणार आहे. FASTag ची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचं इंधन आणि प्रवाशांचा वेळ दोन्ही गोष्टी वाचतील. फास्टॅग अकाउंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाउंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वैधता पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.
FASTag साठी आवश्यक कागदपत्रे:-
वाहनाचं नोंदणीचं पत्र
वाहनाच्या मालकाचा फोटो
KYCसाठी आवश्यक कागदपत्र
वास्तव्याचा दाखला