पत्नीचे दागिने गहाण ठेवून मुलाच्या नोकरीसाठी दिले पैसे…
माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातातून सावरल्यानंतर पुन्हा एकदा मुंडे हे बीडमध्ये दाखल झाले होते. परंतू, याचवेळी आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करुन आदेशाचे बनावट पत्र देत मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीच्या सुरु असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस कर्मचारी लिपिक भरतीचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंत्रालयातील कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंत कदम यांनी याप्रकऱणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आता या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण कदम हे आपल्या कुटुंबासह गोवंडी येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्या एम.एस.सी. झालेल्या मुलाच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु होते.याचवेळी रणजित कदम या त्यांच्या मुलाने व्हॉट्सॲपवरील सरकारी नोकरी संदर्भातील जाहिरात बघून निखिल माळवे याच्याशी संपर्क साधला. माळवे याने त्याला थेट मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला मुलाखतीसाठी 30 हजारांची तर कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी साडे सात लाख रुपयांची मागणी केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
पत्नीचे दागिने गहाण ठेवून दिले पैसे…
धनंजय मुंडे सामाजिक न्यायमंत्री असताना त्यांच्या कार्यालयाबाहेर काढलेले फोटो सोशल मीडियावर ठेवत निखिल माळवे हा विश्वास संपादन करत होता.मात्र, मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून तक्रारदार कदम हे पैसै देण्यास तयार झाले. त्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवून माळवेला 7 लाख 30 हजार रुपये दिले. रणजीतला मंत्रालयात मुलाखतीसाठी बोलावून तेथे शुभम मोहिते याच्याशी भेट घालून दिली. मोहितेने मुंडे यांच्या कार्यालयात शिपाई असल्याचे सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.