येस न्युज मराठी नेटवर्क : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आणखी महत्त्वाच्या व्यक्तींना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्याचं निवासस्थान, राज्यपाल, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांच्या घराला आणि मंदिरांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी पत्राद्वारे देण्यात आल्याचं कळतंय. बुझवारी दुपारी सुल्तानपूरमधील लोधी रेल्वे स्टेशनवर एक पत्र मिळालं आहे. जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरनं हे पत्र लिहिलं आहे. पंजाबमधील सुल्तानपूर लोधी, फिरोजपूर आणि जालंधर ही रेल्वे स्टेशन देखील उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
जालंधर, सुल्तानपूर लोधी, फिरोजपूर, लोहियांखास, फगवाडा आणि तरणतारण रेल्वेस्टेशनवर २१ मे रोजी स्फोट होतील, अशी धमकी देण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, पंजाबचे राज्यपाल, विभागीय रेल्वे मॅनेजर सीमा शर्मा, अकाली दलाचे नेते यांच्यावर २३ मे रोजी हल्ला केला जाईल, अशी धमकी त्या पत्राद्वारे देण्यात आली आहे. पटियालामधील देवी तलाव मंदिर,काली माता मंदिर, फगवाडामधील हनुमान मंदिरात देखील स्फोट केले जातील अशी धमकी देण्यात आली आहे.
सुल्तानपूर लोधी रेल्वे स्टेशनवर मिळालेल्या पत्राच्या खाली पाकव्याप्त काश्मीरमधील जैश ए मोहम्मदचा कमाडंर सलीम अन्सारी याचे नाव आहे. सुल्तानपूर लोधी येथील डीएसपी राजेश कक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पत्र रेल्वे स्टेशनच्या तिकीट काऊंटरवर ठेवण्यात आली होतं. माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तानुसार ते पत्र पोस्टाद्वारे सुल्तानपूर लोधी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांना मिळालं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. त्यातून पुरावा मिळेल अशी अपेक्षा पोलिसांना आहे. पंजाबचं पोलीस दल या पत्रानंतर सतर्क झालं आहे.
सुल्तानपूर लोधी रेल्वे स्टेशनच्या स्टेशन मास्तर यांना पत्र मिळाल्यानंतर धक्का बसला आहे. स्टेशन मास्तरनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. स्टेशन मास्तरना मिळालेल्या पत्रावर पोस्टाचं तिकिट चिकटवण्यात आलं आहे. मात्र, त्यावर तारिख आणि शिक्का नाही.