सोलापूर, दि. 23- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रातर्फे डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त उत्कृष्ट वाचकांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यापीठातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, शिवाजी शिक्षण मंडळाचे सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. अनिल घनवट कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.

यावेळी जयकुमार शितोळे यांचे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल व्याख्यान पार पडले. यावेळी त्यांनी मामासाहेब जगदाळे यांनी बार्शीत सुरू केलेल्या बोर्डिंग, शिक्षण संस्था याबद्दल माहिती दिली तसेच त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य मोठे असल्याचे सांगून गोरगरिबांना त्याचा फायदा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिक्षक गटातून उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रा शिवानंद तडवळ, कर्मचारी गटातून सुप्रिया जाधव-अनभुले आणि विद्यार्थी गटातून ओंकार सोनवले, स्वाती कोळी यांनी पटकाविले. यावेळी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच पुस्तक परीक्षण स्पर्धेतील विजेते विद्यार्थी भारती गुरव, सुजाता गावडे, अमीर बारस्कर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले तर आभार वरिष्ठ ग्रंथालय सहायक डॉ. पल्लवी सावंत यांनी मानले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रातर्फे उत्कृष्ट वाचकांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, पी. टी. पाटील, जयकुमार शितोळे, डॉ. अनिल घनवट आदी.