येस न्युज मराठी नेटवर्क । “भाजपाला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे,” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं होतं. त्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाला टोला लगावला आहे. “खरंच, भाजपाला खूश करून… भाजपाला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा आणि भाजपाचं हे मोठं षडयंत्र होतं, याचा हा कबूलीजबाब आहे. भाजपाने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली, तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.
अलिकडेच शिवसेनेत दाखल झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रणौत यांच्यात नववर्षाच्या सुरूवातीलाच वादाची ठिणगी पडली. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ऑफिससाठी नवी जागा विकत घेतल्याचं समोर आलं होतं. कंगनानं त्याच मुद्द्यावर उर्मिला मातोंडकरांना लक्ष्य केलं होतं. कंगनाच्या याच ट्विटवर बोट ठेवत काँग्रेसनं भाजपावरही निशाणा साधला आहे.