पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे ‘स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र स्थापन व्हावे यासाठी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा सचिन गायकवाड हे अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नामुळे विद्यापीठामध्ये यावर्षी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती ‘स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र’ यास मान्यता देण्यात आली . या अध्यासन केंद्रासाठी विद्यापीठाने 30 लाख रुपये निधीची तरतुदी करण्यात आलेली आहे. या अध्यासन केंद्राचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड तर समन्वयक डॉ.विकास पाटील यांची निवड करून अनेक इतिहास तज्ञ प्राध्यापकांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब व्यवस्थापन परिषद कक्षात ‘स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र कृती समितीची पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा सचिन गायकवाड हे होते त्यांनी, या अध्यासन केंद्राची निर्मिती, उभारणी, स्वरूप, वाटचाल व राबविण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रम याविषयी माहिती दिली. तसेच ते म्हणाले की, विद्यापीठाच्या परिसरात भव्य असे अध्यासन केंद्राची स्वतंत्र इमारत निर्माण करण्यात येईल व त्यासाठी केंद्र, राज्य, खाजगी संस्था व दानशूर व्यक्ती यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी संकलन करून हे अध्यासन केंद्र नावारुपास आणणे व छत्रपती संभाजी महाराजांचे विचार व कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हा आपला मानस आहे असे ते म्हणाले.
ज्येष्ठ इतिहास तज्ञ डाॅ. चंद्रकांत चव्हाण यांनी यावेळी अध्यासन केंद्रा मार्फत स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील ऐतिहासिक ग्रंथ, साहित्य उपलब्ध करून वास्तविक इतिहास समाजापुढे मांडणे हे अध्यासन केंद्राचे उद्दिष्ट राहील आणि अध्यासन केंद्रामार्फत विविध उपक्रम, कार्यक्रम, अभ्यासक्रम, संशोधन, ऑफलाईन व ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स विद्यापीठ स्तरावर व महाविद्यालय अभ्यासक्रमात सुरू करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी ऐतिहासिक माहिती अनेक कागदपत्रे व साधनातून चुकीची दिलेली आहे त्यामुळे त्यांचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे, हा विचार करून अध्यासन केंद्रामार्फत वास्तविक इतिहास समाजापुढे येण्यासाठी विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा,सेमिनार व परिषद यांचे आयोजन करून नवीन इतिहास व माहिती समाजापुढे मांडणे असे मत विद्यापीठाचे इतिहास विषयाचे बी ओ एस अध्यक्ष डॉ.विष्णू वाघमारे यांनी आपले मत मांडले तर सुटा संघटनेचे अध्यक्ष डाॅ. नेताजी कोकाटे यांनी अध्यासन केंद्रामध्ये संभाजी महाराजांच्या जीवन व चरित्राविषयी आणि कार्यासंबधी असणारे ऐतिहासिक स्थळे यांना भेट देऊन, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंबधीत ऐतिहासिक वस्तू,ग्रंथ व साधने जतन व संवर्धन करण्यासाठी विद्यापीठात म्युझियम स्थापन करावे असे मत मांडले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ध्येय व हेतूने सर्वांना एकत्र बरोबर घेऊन गुलामगिरीच्या विरोधी लढा उभारून लोकांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय भावनेने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन व कार्य, स्वकीय व परकीय लोकांबरोबर असणारे संबंध व संघर्ष, प्रशासन,युध्दनीती, राजकारण धर्मकारण अर्थकारण व लोककल्याणकारी कामे आणि शेवटी स्वराज्याच्या रक्षणासाठी दिलेले हौतात्म्य या युगपुरुषाचा ऐतिहासिक वारसा व विचार त्या काळात निर्माण झालेला होता तो आधुनिक काळात लोकांपर्यंत पोहोचवणे व जनजागृती करणे यासाठी अध्यासन केंद्रातील सर्व सदस्यांनी आपापली वरील मते या बैठकीत मांडण्यात आली.
या अध्यासन केंद्राच्या बैठकीस अध्यक्ष म्हणून प्रा सचिन गायकवाड तर समन्वयक डॉ. विकास पाटील, सदस्य म्हणून डाॅ. विष्णू वाघमारे, डॉ. चंद्रकांत चव्हाण, सुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. नेताजी कोकाटे, डॉ. अरुण सोनकांबळे, डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. विकास शिंदे , डॉ. सज्जन पवार हे सदस्य उपस्थित होते तर विद्यापीठाचे कक्षा अधिकारी श्री नासिर देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. या अध्यासन केंद्राच्या बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. विकास पाटील , प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गायकवाड तर आभार डॉ.विकास शिंदे यांनी मानले.