अमरावती : जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून ११ जण बुडाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांना शोध बचाव पथकाने सुरू केला आहे. गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले होते. सोमवारी दशक्रिया विधी आटोपल्यानंतर मंगळावरी सकाळी सर्व जण श्री क्षेत्र झुंज येथे पोहचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. एका बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली. त्यात कुटुंबातील अकरा जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेत सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मदत व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. आतापर्यंत चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.