निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. सुरेश पवार यांची नियुक्ती
सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांची नियुक्ती झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. पवार यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनिमित्त बुधवारी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी डॉ. पवार यांचा कुलगुरू दालनात सत्कार केला. यावेळी वित्त व लेखा अधिकारी सीए श्रेणीक शहा उपस्थित होते.
विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद, अभ्यास मंडळे आणि व्यवस्थापन परिषद या चार प्राधिकरणांच्या कार्यकारिणीची मुदत 31 ऑगस्ट 2022 रोजी संपुष्टात येत आहे. यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता पुढे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेसाठी पदवीधर, शिक्षक, प्राचार्य, संस्था प्रतिनिधी आदींची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याचबरोबर इतर प्राधिकरणासाठीही मतदार यादी तयार होईल. त्यासाठी प्रक्रियेची वेळापत्रक विद्यापीठ प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी सांगितले.
फोटो ओळी:
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. सुरेश पवार यांची नियुक्ती झाल्याने कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी वित्त व लेखा अधिकारी सीए श्रेणीक शहा उपस्थित होते.