मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज गुवाहाटी जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा तिसरा गुवाहाटी दौरा आहे. या दौऱ्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांनीही उधाण आलं आहे.
सत्ता स्थापनेनंतर आमदारांसह घेतलं होतं कामाख्या देवीचं दर्शन
एकनाथ शिंदे अडीच वर्षांपूर्वी शिवेसेनेतून बंडखोरी करत वेगळी चूल मांडली होती. त्यावेळी सर्व आमदारांना घेऊन ते गुहावाटीला गेले होते. त्यानंतर भाजपाच्या मदतीने त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही सत्तास्थापन करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटी जात कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा गुवाहाटी जात कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे.
गुवाहाटी पोहोचताच एकनाथ शिंदेंनी साधला माध्यमांशी संवाद
गुवाहाटी पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आम्ही कामाख्या देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला आलो असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून दुसरी यादीही लवकरच जाहीर होईल, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विजय निश्चित आहे, असे ते म्हणाले.