पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीत रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कथित रेव्ह पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या अॅड. रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात कोकेन, गांजा यासह इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस योग्य तो तपास करत आहेत. मात्र, कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं काही करायचं नसतं’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजित पवार काय म्हणाले ?
“पुण्यातील रेव्ह पार्टीची जी काही घटना घडली आहे, त्या घटनेचा तपास कायद्याने आणि नियमाने पुण्याचे सीपी करत आहेत. जे त्या ठिकाणी सापडलेले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तसेत कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं काही करायचं नसतं”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.