सोलापूर : शिक्षणाधिकारी लोकांना वेळ देत नाहीत. लोक दिवसभर थांबून थांबून जातात. त्यांची कामे होत नाहीत, यामुळे चिडलेले काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिनाथ पाटील यांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या कार्यालयाला सोमवारी सायंकाळी कुलूप ठोकल्यानंतर जगताप यांना उपरती आली, आता त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यात संवाद दिन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हा निर्णय सोमवारी रात्रीच जाहीरही झाला.
शिक्षणाधिकारी जगताप यांनी संवाद दिनाचे वेळापत्रक जारी केले असून, सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ आणि बार्शी तालुक्यांसाठी महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे हॉल येथे संवाद साधण्याचे ठरविले आहे.
पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात महिन्याच्या चौथ्या गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील लोकांना भेटण्याचे निश्चित केले आहे.