सोलापूर – शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसते, तर ते मानवी मूल्ये, चारित्र्य, आणि समाजाची जबाबदारी यांना आकार देण्याचे सशक्त साधन आहे. त्यामुळे माणसाला माणूस बनवणारी प्रक्रिया म्हणजेच खरे शिक्षण होय, असे प्रतिपादन वालचंद महाविद्यालयातील समाजकार्य विभागाच्या प्राध्यापिका डॉ. निशा वाघमारे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुल अणि पीएम- उषा यांच्या संयुक्त विद्मामाने समाजशास्त्राचा पाया: यशाचा सेतू या विषयावर ब्रिज कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. या ब्रिज कोर्सच्या उद्धाटन प्रसंगी डॉ. निशा वाघमारे बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास व पुरातत्त्वशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. निशा वाघमारे यांनी नवीन शैक्षणिक धोरण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. एनईपी हे फक्त अभ्यासक्रमातील बदल नाही, तर शिक्षणाच्या संपूर्ण दृष्टिकोनात आमूलाग्र परिवर्तन घडवणारी रचना आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे कौशल्य, विचारशक्ती आणि मूल्याधारित शिक्षण याला प्राधान्य दिलं गेलं आहे. हे धोरण विद्यार्थ्यांमध्ये स्व-शिक्षणाची वृत्ती, बहुआयामी कौशल्य विकास आणि संपूर्ण विकास साध्य करण्यासाठी आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी एनइपी च्या माध्यमातून संकल्पनात्मक स्पष्टता, रोजगारक्षम शिक्षण, आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाची स्पर्धात्मकता यावर भर दिला असल्याचेही स्पष्ट केले. आपले भाषण एकतर्फी न ठेवता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे म्हणाले, विद्यार्थी हा संकुलाचा केंद्रबिंदू आहे, आणि संकुलात राबवली जाणारी प्रत्येक उपक्रमाची आखणी ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच असते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. ज्ञानेश्वरी हजारे यांनी केले. ब्रिज कोर्सच्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.