मुंबई : “जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतात. राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर सुरु आहे. पण ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या चर्चेनंतर राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकंच नाही तर सरकार टिकू देऊ नका असं सांगत भाजपचे काही नेते धमकावत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतं. वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आली आहे. आता माझ्या नावाचाही गजर सुरु आहे. ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. घरातील महिलांना, कुटुंबीयांना लक्ष्य करणं ही नामर्दानगी आहे. या नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआड खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.