मुंबई : आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज दुपारी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. त्यावेळी उच्च न्यायालयात अचानक वकिलांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. न्यायाधीशांना काम करणंही अडचणीचं झालं. त्यामुळे न्यायाधीश आपल्या आसनावरून उठले. त्यानंतर या वकिलांना आणि ज्यांचा प्रकरणाशी संबंध नाही अशा लोकांना बाहेर काढण्यात आलं. या सर्व गोंधळात पंधरा मिनिटं गेली. त्यानंतर पुन्हा सुनावणीस सुरुवात झाली.
सेशन्स कोर्टातही दिलासा न मिळाल्याने आर्यन खानच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामीनावर आज सुनावणी होणार असल्यानं संपूर्ण मीडियाचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. त्यामुळे मीडियाचे प्रतिनिधी दुपारीच कोर्टात हजर झाले होते. त्याचबरोबर उच्च न्यायालयातील वकीलही युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टात हजर झाले. एक एक करत अनेक वकील कोर्ट रुममध्ये आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे कामकाज करणं कठिण झालं. न्यायामूर्ती नितीन सांब्रे यांनी हा गोंधळ पाहून ते आपल्या न्यायासनावरून उठले. न्यायालयात झालेल्या गर्दीवर न्यायाधीश सांबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी गर्दी कमी करण्याचे आवाहन केले आहे.