येस न्युज मराठी नेटवर्क : अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या एका भन्नाट आवाहनाला मोठे यश मिळताना दिसत आहे. कारण पारनेर तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावागावात वाद-विवाद, भांडण होऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवली. “ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि गावच्या विकासासाठी 25 लाख रुपये घेऊन जा” असे लंके यांनी आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पारनेर तालुक्यातील तब्बल 30 गावातील ग्रामपंचायतने बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाहीतर आणखी 10 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणार असल्याचा विश्वास आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे.
आमदार निलेश लंके यांनी केलेल्या आवाहनाला सर्वात पहिले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी ग्रामपंचायत प्रतिसाद देत बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता तीस ग्रामपंचायतीने बिनविरोध निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने पारनेर तालुक्यात अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकोपा टिकवण्यासाठी सर्व घटकांना समान न्याय देऊन आपली ग्रामपंचायत बिनविरोध करा,तुमच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझी असेल, असं देखील आवाहन आमदार निलेश लंके यांनी फेसबुकवर देखील केलं होतं.