सोलापूर : “कठिणातील कठीण विषय अभ्यासनाट्याच्या माध्यमातून सोपे करून सांगता येतात. अभ्यासनाट्यामध्ये विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीची संधी मिळते, नाटक हे दृकश्राव्य असल्याने त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो.” असे प्रतिपादन नाट्य प्रशिक्षक प्रकाश पारखी यांनी व्यक्त केले. प्रिसिजन फाउंडेशनने आयोजित केलेल्या “अभ्यासनाट्य” स्पर्धेच्या बक्षीस समारंभात ते बोलत होते.
शिवस्मारक सभागृहात झालेल्या या अभ्यासनाट्य स्पर्धेत शहर आणि जिल्ह्यातील ११ शाळांची १९ नाटके सादर करण्यात आली. त्यात हिंगुलांबिका प्राथमिक शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर सोनोमाता प्रशाला लिमयेवाडीच्या संघाने द्वितीय आणि इनोव्हेटिव्ह स्कूल, अंकोली ता मोहोळ यांनी तिसरा क्रमांक पटकावला. आण्णप्पा काडादी हायस्कूलला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. हिंगुलांबिका प्रशालेच्या अश्विन संगवे यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक तर उत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक अश्विन संगवे आणि पैगंबर तांबोळी यांना विभागून देण्यात आले.
प्रारंभी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रकाश पारखी, सर फाउंडेशनचे सिध्दाराम माशाळे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभ्यासनाट्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रिसिजनने सोलापूर शहर व जिल्ह्यातील शाळांमध्ये अभ्यासनाट्य विषयात अभ्यासक्रमातील विषय घेऊन नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण याचे प्रशिक्षण दिले गेले. त्यातून या अंतिम स्पर्धा घेण्यात आल्या.
