प्रिसिजन संगीत महोत्सव २०२५
शनिवार, दिनांक १५ फेब्रुवारी : हुतात्मा स्मृती मंदिराच्या स्वरमंचाचा पडदा उघडताच
मंद निळ्या चांदण्याचा वर्षाव करत माघ वद्य तृतियेला व्यासपीठावर उगवलेला पौर्णिमेचा चंद्र दिसताच रसिकांनी आनंदानुभूतीने टाळ्यांचा प्रतिसाद दिला.
प्रारंभी प्रथम सत्रातील कलावंत डॉ. शंतनु गोखले आणि यशवंत वैष्ष्णव तसेच फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा , यतिन शहा, करण शहा, मयुरा दावडा शहा, डॉ. सुधाशु आणि डॉ. किरण चितळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न झाले.
पहिल्या सत्राचा प्रारंभ विश्वविख्यात संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनु गोखले यांच्या संतूरवादनाने झाला. राग झिंझोटीच्या सुमधूर स्वरात त्यांनी ‘आलाप’ ‘जोड’ व ‘झाला’ सादर केला. खमाज थाटातील या रागातील धसारेमग, सारे मग, सारे नि ध सा, रेमपधसां नि ध, मपधमग, मपधनीधप, सारेमग.. अशा विशिष्ट स्वरसमूहांनी गंधारावर सुंदर न्यास करत रसपरिपोष करणारी आलापी रंगली.जोड झाला प्रकारात त्यांनी लयकारीचे छान दर्शन घडवले.
त्यानंतर त्यांनी मध्यलय रूपक व द्रुत तीनतालातील गती सादर केल्या.. त्यानंतर राग पहाडी मध्ये धून सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
त्यांना यशवंत वैष्णव यांनी तबल्याची अत्यंत तैय्यारीने व रंगतदारपणे साथसंगत केली. अत्यंत स्पष्ट व गतीमान बोलरचना, ‘दायॉं-बायॉंचे’ विलक्षण संतुलन व संतूरच्या नाजूक स्वरांना पोषक ठरेल अशी संयमित व लयकारीने नटलेली साथसंगत हे एक या सत्राचे वैशिष्ट्य होते.
दुसऱ्या सत्रात पंडित कुमार गंधर्वांचे नातू पंडित भुवनेश कोमकली यांनी गायन सादर केले.