रुग्णांना चांगली सेवा देण्यावर भर देण्याचा केला निर्धार
सोलापूर : येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथील अधिष्ठातापदी परभणीचे डॉ. सदानंद भिसे यांची निवड करण्यात आली. त्यांनी बुधवारी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला.
दरम्यान, नवे अधिष्ठाता भिसे हे यापूर्वी परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. यापूर्वी भिसे यांनी जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी राज्य अवयव व प्रत्यारोपण समिती प्रमुख म्हणूनही काम पाहिले असून, ते हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई येथे महाव्यवस्थापकपदी कार्यरत होते.पदभार घेतल्यानंतर बोलताना डॉ. भिसे म्हणाले की, मी यापूर्वी सोलापूर येथील न्यायवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवा बजाविली आहे. त्यामुळे येथील अडीअडचणी मला माहिती आहेत. सोलापूर शहर हे सीमेवर असल्याने येथील रुणांची संख्या जास्त असून, त्यांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार असल्याचे भिसे म्हणाले.