सोलापूर : सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. स्वत: डॉ धवलसिंह यांनी याला दुजोरा दिला आहे
सुरुवातीला अनेक वर्षे शिवसेनेत राहिलेले डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी होती. मात्र भाजपच्या साथीला शिवसेनेला राहावे लागल्याने धवलसिंह याना सेनेतून म्हणावा तास न्याय मिळाला नव्हता. यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर, डॉ धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते.
यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह याना गळाला लावलं. त्यांनी गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा जोरदार प्रचार केला आणि लोकसभा निवडणुकीत सव्वा लाखाचे लीड देणाऱ्या मोहिते पाटील यांना भाजपासाठी ही जागा कशीतरी टोकावर निवडून आणता आली होती. मात्र यानंतरही राष्ट्रवादीत धवलसिंह यांना पक्षात दुर्लक्षित केल्याच लक्षात येऊ लागताच त्यांनी थेट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.