पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२५ च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२५ च्या सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
उत्सव साजरा करताना अनेकदा कायदेशीर बाबींचे उल्लंघन होते. अशावेळी कोणीही कायदा हातात घेऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव शांततेत साजरा करावा. मिरवणुकीत अडथळा होऊ नये, यासाठी मोठे आणि लांब कंटेनर वापरू नयेत. ध्वनी प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत आणि मिरवणुकीत फक्त एक बेस आणि एक टॉपलाच परवानगीचा वापर करावा असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.


बैठकीची प्रस्तावना पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी केली. यावेळी त्यांनी १४ ते २० एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा होत आहे. २० एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजविण्यात यावीत. उत्सव काळात सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरांची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा. देखावे, चित्र आक्षेपार्ह नसावीत, प्रबोधनात्मक जनजागृती करावी, अशा सूचना केल्या.
याप्रसंगी सोलापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.