डीएड, बीएड-धारकांना कंत्राटी पद भरतीची प्रक्रिया तूर्त थांबली
सोलापूर : शालेय शिक्षण विभागातर्फे १० किंवा त्यापेक्षा कमी पट संख्येच्या शाळांमध्ये १५ हजार रुपये मानधनावर कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती प्रक्रिया तूर्त थांबविण्यात आली आहे. गुरुवारी झालेल्या राज्यभरातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत कमी पट संख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी पद भरतीसाठी अर्ज प्रक्रीया सुरु करु नये, असे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सोलापुरात ५२ पदांची नियुक्ती होणार होती. त्या उमेदवारास १५ हजार रुपये मानधनासह, काही नियमावली निश्चित केली होती. त्यासाठी पुढील आठवड्यापासून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार होती. पण, गुरुवारी (दि.५ शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकीत ती प्रक्रिया तूर्त स्थगित झाली. आहे. दरम्यान, कंत्राटी पदासाठी अर्ज स्वीकृती कधीपासून सुरु होणार? याबाबत शिक्षण विभागात चौकशीसाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेर, कंत्राटी शिक्षक भरतीसाठी भेटू नये, नंतर कळविण्यात येईल, असे फलक लावण्यात आला.
राज्यशासनाने २० किंवा त्यापेक्षा कमी पट-संख्येच्या शाळेत सेवानिवृत्त, कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय घेतला होता. यावर आक्रोश मोर्चा काढला होता. त्याची दखल घेऊन शासनाने हा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर १० किंवा त्यापेक्षा कमी पट संख्येच्या वर्गावर नियमीत ऐवजी स्थानिक डीएड किंवा बी.एड झालेल्या सुशिक्षित बेरोजगारास संधी देण्याचा निर्णय घेतला होता.