येस न्युज मराठी नेटवर्क : “स्वच्छ शाळा सुंदर शाळा” अभियान यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सीईओ स्वामींनी नुकतीच जनसंजीवनी अभियानाची घोषणा केली होती. आज सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी जनसंजीवनी अभियानाची शपथ घेऊन या अभियानाला प्रत्यक्ष सुरूवात केली. शपथ घेतल्यानंतर कर्मचारी व अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात स्वच्छता करणे, वृक्षारोपण आदी कामकाजाला सुरुवात केली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात उपाययोजना, जेई लसीकरण, कोविड लसीकरण या सोबतच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे अभियान हाती घेतले आहे. कामाचा अत्यंत ताण असताना आपले आरोग्य केंद्र सुंदर असावे यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. या अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण व सौंदर्यीकरण केले जाणार असून आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी उपस्थित सर्वांनी आपापल्या केंद्रात सौजन्यपूर्ण वागणुकीसंदर्भात शपथ घेण्याचा कार्यक्रम दि. 10 जानेवारी 2022 रोजी घेण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते. शिक्षण विभागानंतर सीईओ स्वामींनी आता आरोग्य विभागाकडे आपला मोर्चा वळवत. ” माझी शाळा सुंदर शाळा” अभियानाच्या यशा नंतर आता जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे सौंदर्यीकरण व सक्षमीकरण करण्याचे ठरविले आहे. माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची दखल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेवून राज्यभर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हे ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी संजिवनी आहेत. ग्रामीण भागातील जनतेला यथायोग्य आरोग्य सेवा पूरविणे हे आरोग्य विभागाचे प्राधन्यक्रम कार्य असून कर्तव्ये आहेत. त्यासाठी जिल्हयातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र हे सक्षमरित्या व पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत रहाणे अत्यंत आवश्यक असून खालील मुद्यांवर या अभियानाची आखणी करण्यात आली होती.
- सध्यस्थितीमध्ये ग्रामीण भागातील विशेषत: शहरापासून दूर असलेल्या प्रा.आ.केंद्र वा उपकेंद्राची सेवा यथायोग्य रितीने होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात.
- आरोग्य केंद्रात डॉक्टर/कर्मचारी हजर नसणे, औषध उपलब्ध नसणे, इतर आवश्यक साहित्य नसणे यासारख्या तक्रारी येत असतात.
- आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टर,कर्मचारी हे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचेशी सौजन्याने न वागणे, हिरीस-फिडीस करणे, टाकून बोलणे यासारखेसुध्दा प्रकार होत असतात, तशा तक्रारीदेखील येत असतात.
- प्रा.आ.केंद्र/उपकेंद्राची भौतिक अवस्थादेखील चांगली नाही, काही प्रा.आ.केंद्र हे अत्यंत शुभक व हरीतरित्या सजवले आहेत, परिसरात फुलांची झाडे, हिरवीगार वनस्पती, स्वच्छता यांनी केंद्र भरभरुन दिसते, तर दुसरीकडे काही प्रा.आ.केंद्राची अतिशय दुरावस्था झालेली आहे.
- काही प्रा.आ.केंद्र/उपकेंद्राचे परिसरात खूप झुडपे, गवत वाढलेले आहे, अस्वच्छता आहे, भिंती/इमारतींचा रंग पूर्णपणे उडून गेला आहे, आतसुध्दा नको ते साहित्य,धूळ इत्यादी भरगच्च दिसते आहे.
- प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र सर्व दृष्टीने सक्षम रहाणेसाठी आरोग्य अधिका-यांची बैठक घेऊन आवश्यक त्या वैद्यकीय सुविधांबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता.
अभियानाची अंमलबजावणी करताना… प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र सक्षमीकरणाच्या कामात ग्रामपंचायत/पंचायत समितीने प्रा.आ.केंद्राला यथायोग्य मदत करावयाची आहे. आवश्यक निधी द्यावयाचा आहे. त्याचप्रमाणे रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातूनही निधी घेता येईल. शक्यतो ग्रामस्तरावर ‘ लोकवर्गणी ‘ उभी करुन काम केल्यास स्वागतार्ह राहील.परिसरातील सेवाभावी संस्था, विविध संघटना, पतसंस्था यांचेदेखील सहकार्य घेता येईल.आपापल्या कार्यक्षेत्रातील बँका, कंपनी यांचेकडून CSR फंड घेऊनही हे सौंदर्यीकरणाचे काम करता येईल.
- सदर अभियानाची सुरुवात दि. 1 जानेवारी 2022 पासून करण्यात यावी.
- दि. 1 जानेवारी 2022 रोजी प्रा.आ.केंद्र /उपकेंद्रातील आतील व बाहेरील 8/10 फोटो काढून स्वाक्षरी करुन ठेवावे.
- अभियानाचे कार्य संपल्यानंतर पुन्हा 8/10 फोटो काढून स्वाक्षरी करुन ठेवावे.
- तुलनात्मक कार्य पाहून “उत्कृष्ट कार्य” साठी प्रत्येक तालुक्यातील एक प्रा.आ.केंद्र निवडण्यात येतील.
- उत्कृष्ट कार्य करणा-या प्रा.आ.केंद्र /उपकेंद्राचे यथोच्छ गौरव व सत्कार मा. पालकमंत्री, अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात येईल.