सोलापूर – तृतीयपंथीय यांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेतर्गंत दि. २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिली.
सदर कार्यशाळेमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये तृतीयपंथीय नागरिकांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देणे, तृतीयपंथीय नागरिकांना रेशन कार्ड प्राप्त होण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन, तृतीयपंथीय नागरिकांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबतचे व मतदानकार्ड प्राप्त होण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन, तृतीयपंथीय नागरिकांसाठी जागृती होण्याबाबत मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन तसेच तृतीयपंथीय व्यक्तीसाठी स्वंयरोजगाराबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर मेळाव्यास येताना तृतीयपंथीय व्यक्तींना तृतीयपंथी असलेबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्याकरिता आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, कलर फोटो, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र आदी कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
या जिल्हास्तरीय कार्यशाळेला तृतीयपंथी समाजासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, संघटना, तृतीयपंथी व्यक्ती यांनी सदर कार्यशाळेचा व मेळाव्याचा लाभ घ्यावा असे, आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री चौगुले यांनी केले आहे.