आरोग्य विभागाच्या कामाचे केले कौतुक
सोलापूर, दि.११: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र कुंभारी १ येथे आज एक हजार कोरोनाच्या लसीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कुंभारी येथील प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली.
शंभरकर यांनी सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, याबाबत स्थानिक नागरिक आणि लस घेण्यासाठी आलेल्यांना मार्गदर्शन केले. कोरोनाची लस सर्वांना मिळणार आहे, यामुळे घाई, गडबड न करता शांततेत लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य विभाग अहोरात्र चांगले काम करत आहे. आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी गर्दीचे नियोजन करावे. लसीकरणापूर्वी आणि लस दिल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
दक्षिण सोलापूर तालुक्यात आतापर्यंत पहिला डोस ६६,५०३ व्यक्तींना दिला आहे तर दुसरा डोस २४,८७४ व्यक्तींना दिला आहे. आज दुपारपर्यंत कुंभारी उपकेंद्रावर ५३४ नागरिकांना लस दिली आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे जिल्ह्याला आज दोन लाख कोरोनाची लस मिळाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी लसीकरणाबाबत सूक्ष्म नियोजन केले आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत सहायक जिल्हाधिकारी तथा दक्षिण सोलापूरच्या प्रांत मनीषा आव्हाळे, तहसीलदार अमोल कुंभार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ सोमय्या पटेल, डॉ अल्पना मंगरूळे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
