सोलापूर : हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा तयार करताना धार्मिक महत्त्व आणि पर्यटनाच्या अनुषंगाने विचार करावा. आराखड्यात व्यावहारिक आणि गरजेची प्राधान्यक्रमाची विकास कामे प्रस्तावित करावीत. भाविकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात याचा विचार करून आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिले.
हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे आणि श्रीनिवास गुजरे, भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. बागडे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, नगररचनाकार आर. सी. दनाने, डॉ. व्यंकटेश मेतान, प्रल्हाद कांबळे, दै. सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी यांच्यासह ग्रामविकास, बांधकाम, पाटबंधारे, महावितरण अशा संबंधित विभागाचे प्रमुख, देवस्थान समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सल्लागार आशुतोष पाटील यांनी हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्याचे सादरीकरण केले. आमदार सुभाष देशमुख व मान्यवरांनी मौलिक सूचना केल्या.
यावेळी टाकळी मुख्य महामार्गापासून तीर्थक्षेत्रपर्यंत रस्ता, भाविकांची संख्या, भीमा व सीना या दोन्ही नदीतीरावर मंदिराच्या बाजूस घाट बांधणे व नद्यांना येणाऱ्या संभाव्य पुरापासून मंदिराचे संवर्धन होण्यासाठी तटबंदी बांधणे, पर्यटकांसाठी बोटिंग सुविधा, पूरसंरक्षक भिंती, वॉटर लेझर शो, चिल्ड्रेन पार्क, कारंजे असणाऱ्या उद्यानाची निर्मिती, श्री संगमेश्वर कुस्ती केसरी स्पर्धेसाठी कुस्ती स्टेडियम, व्यापारी गाळे, भक्त निवास, स्वच्छतागृहे, पुरातत्व वास्तु संग्रहालय, अन्न छत्र, ध्यान मंदिर, गोशाळा, सोलर पथदिवे, सुसज्ज ग्रंथालय, वाहनतळ, बसवेश्वर स्मारक आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.