नागरिकांना मिळणार सर्व विभागाच्या सेवांची माहिती व कायदेविषयक सल्ला
सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी दोन वाजता शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वळसंग येथे महा विधी(कायदेशीर) सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच कायदेविषयक माहिती घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शशिकांत मोकाशी यांनी केले आहे.
या शिबीरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिबीरात विविध स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शन, महसूल, पंचायत, पोलीस, कृषी, महिला व बालकल्याण, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, आदिवासी विकास, कामगार, महावितरण, परिवहन, जिल्हा उद्योग, पशुसंवर्धन, पोस्ट ऑफिस, रेशीम, रोहयो, सहकार, किमान कौशल्य आदी विभागाकडील योजना आणि सेवांची माहिती व लाभ देण्यासाठी स्टॉलमधून अर्ज वाटप आणि स्वीकृती करण्यात येणार आहे.
शिवाय लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लाभाचे वाटप, आधार नोंदणी आणि अपडेशन, कोविड लसीकरण, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, शिधापत्रिका संबंधित कामे, संजय गांधी आणि श्रावण बाळ, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना याबाबतचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक मतदार नोंदणी अर्ज स्वीकृती, मोफत सातबारा वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होवून कायदेविषयक मार्गदर्शन, शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.