सोलापूर – विद्यार्थ्यांना अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देऊन त्यांची वैचारिक समज व वास्तविक जीवनातील ज्ञानाचा वापर आणि योग्यतेवर आधारित मूल्यांकन करणे आणि माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चिमुकल्यांना करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेतून गळती झाल्यास पुन्हा प्रवेश देऊन अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘पीएम श्री’ योजना राबवली जात आहे. शाळांमध्ये लायब्ररी व संगणक कक्ष, यासह इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतानाच ‘पीएम श्री’ योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाने केंद्रासमवेत सामंजस्य करार केला आहे. त्यात केंद्राचा ६० टक्के हिस्सा आहे. प्रत्येक शाळेसाठी एक कोटी ८८ लाखाची तरतूद पाच वर्षांसाठी आहे.
अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र व मूल्यमापन, प्रवेश आणि पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती आणि लैंगिक समाधान, व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन व लाभार्थी समाधान अशा प्रमुख सहा आधारस्तंभांवर शाळांचा विकास केला जाणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ४८८ तर ‘पीएम श्री’ योजनेत राज्यातील ८४६ शाळा निवडल्या आहेत. त्या शाळांचा सर्वांगिण विकास करतानाच त्या शाळांमधील शिक्षकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे (डायट) प्रशिक्षण दिले जाणार आहे.
त्या शाळा संबंधित तालुक्यांमध्ये आदर्श (मॉडेल स्कूल) बनवून त्या धर्तीवर इतर शाळांचा विकास करण्यासाठी लोकसहभाग घेतला जाणार आहे. शासकीय शाळांमधील गुणवत्ता वाढावी, पटसंख्या वाढावी, हा त्यामागील हेतू आहे.
जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी, या हेतूने दोन्ही योजनांअंतर्गत विविध कामे होणार आहेत. त्यातून किचन शेड, लायब्ररी, संगणक कक्ष, क्रीडांगण स्वच्छता, वॉल कंपाउंड, शौचालये, हॉल, वर्गखोल्या बांधणे, अशी कामे होतील.
असे प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर संजय जावीर म्हणाले.
शासकीय योजनांमध्ये निवडलेल्या शाळा
जिल्हा परिषद गुड्डेवाडी, नागणसूर (अक्कलकोट), भाटंबरे, सासुरे (बार्शी), चिखलठाण व वांगी नं. एक (करमाळा), जिल्हा परिषद माढा हायस्कूल, कव्हे (माढा), दसूर, मारकरवाडी (माळशिरस), भाळवणी, पाटखळ (मंगळवेढा), देवडी, चिंचोलीकाटी (मोहोळ), करोळे, तपकरी शेटफळ (पंढरपूर), कोळा मुलींची शाळा व महिम (सांगोला), कोंडी, सोरेगाव (उत्तर सोलापूर), कणबस, कंदलगाव मुलांची शाळा (दक्षिण सोलापूर) आणि महापालिका मुलांची शाळा क्र. २९ व मुलांची शाळा क्र. २८ या शाळांची निवड ‘पीएम श्री’अंतर्गत झाली आहे.
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ११ शाळांची दुरुस्ती तर तीन शाळांचे नव्याने बांधकाम होणार आहे. त्यात जिल्हा परिषद शाळा बोरामणी, बीबी दारफळ, महूद, रांझणी, ढवळस, महाळुंग, माढा नं. एक, वाशिंबे, मानेगाव, सातनदुधनी व महापालिकेची कॅम्प शाळा क्र. एक यांची निवड झाली आहे. तसेच माढा क्र. एक, बोरामणी व बीबी दारफळ या शाळांचे बांधकाम नवीन होणार आहे.