मुलींच्या सर्वांगीण विकासाचे आई प्रतिष्ठानचे प्रयत्न कौतुकास्पद
सोलापूर : मुली शिकल्या तर देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देऊ शकतात. त्यामुळे मुलींच्या सर्वांगीण विकासाचे आई प्रतिष्ठानचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
आई प्रतिष्ठानतर्फे श्री मार्कंडेय हायस्कूल, सोनामाता प्रशाला, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला आणि कुचन प्रशाला या चार शाळांमधील ३६३ विद्यार्थिनींना दिवाळीनिमित्त कपडे आणि फराळ देण्याचा कार्यक्रम गुरुवारी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे ३६३ मुलींपैकी बहुतांश मुलींना फक्त आई किंवा वडिलच आहेत. तर अनेक विद्यार्थिनींची आर्थिक परिस्थिती हालखीची आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पूर्व विभाग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सहसचिवा संगीता इंदापुरे , उद्योजक वैभव पाटील, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, आयुष्यात अनेक संकटे येतील. सर्व काही संपले असे वाटेल. परंतु विद्यार्थिनींनी हार मानू नये. यशासाठी फक्त परिश्रम न करता कोणत्या दिशेने परिश्रम करत आहोत याचा विचार विद्यार्थिनींनी करावा. आपल्या मनात कोणताही न्यूनगंड न बाळगता विद्यार्थिनींनी कठोर मेहनत करून यश मिळवावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने म्हणाले, आई प्रतिष्ठानसारख्या संस्थांचे समाजावरती ऋण आहेत. यातून उतराई होण्याचा प्रयत्न विद्यार्थिनींनी केला पाहिजे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन मुलींनी मोठे होऊन एका निराधार महिलेचा सांभाळ करावा, असे आवाहनही पोलीस आयुक्त डॉ. माने यांनी केले.
आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी रानसर्जे यांनी सूत्रसंचालन तर सृष्टी डांगरे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास आई प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सचिन हिरेमठ, सचिव योगेश डांगरे, खजिनदार राहुल डांगरे, सृष्टी डांगरे, विश्वस्त वसंत जाधव, दादाराव चव्हाण, पंचय्या स्वामी, अविनाश शंकू, शुभम चिट्याल, विवेक नक्का, सूर्यकांत जिंदम, व्यंकटेश बंडा, उमेश चिट्याल, बाबू चिप्पा आदी उपस्थित होते.
मुलींनी पुष्पवृष्टीने केले अधिकाऱ्यांचे स्वागत
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांचे मुलींनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.