सोलापूर : विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचाऱ्यांच्या परीक्षावर बहिष्कार आंदोलनाचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सर्व कुलगुरू यांना कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यास प्रवृत्त करावे अन्यथा शिस्तभंगाची नोटीस बजावी अशा सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात व्यवस्थापन परिषद सभागृह येथे शुक्रवारी कुलसचिव, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ आणि विभागीय सहसंचालक यांच्यासमवेत शुक्रवारी विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सर्व प्रतिनिधीसमवेत बैठक झाली. त्यांनी परीक्षेवरील बहिष्कार मागे घेणेबाबत संघटनेस विनंती केली. परंतु कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलनाचे ठरलेले टप्पे मागे घेण्यास नकार देऊन सेवक संयुक्त कृती समितीद्वारे प्राप्त आदेशानुसार आंदोलन आधीक तीव्र करण्यात येईल असे, सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे व महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे यांनी कळविले आहे.