आता वक्फ बोर्ड आहे म्हणून सनातन बोर्ड स्थापन करण्याची आवश्यकता नाही, असे खडेबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावल्यानंतरही भाजप नेत्या नवनीत राणा आक्रमक झाल्यात. राणा यांनी वक्फ बोर्ड बंद करून त्याच्या जागी सनातनी बोर्ड स्थापन करण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. राणा यांनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी करण्याचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
राज्यात लव्ह जिहाद, फसवणूक व जबरी धर्मांतर रोखण्यासाठी एक कायदा करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक विशेष समिती नियुक्त केली आहे. ही समिती राज्यातील स्थितीचा अभ्यास करून त्यावर विविध उपाययोजना सूचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी लव्ह जिहादविरोधी कायद्यावर भाष्य करत उपरोक्त मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सध्या तरी सनातन बोर्ड स्थापन करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. फडणवीस म्हणाले होते की, सनातन बोर्डाची सध्या तरी आवश्यकता आहे असे वाटत नाही. कारण आपली संस्कृती सनातन आहे. सनातनचा अर्थ जी नूतन आहे आणि पुण्यपुरातन आहे. या सगळ्या गोष्टीची व्याख्या अतिशय संकुचित अशी घेतली जाते. मुळात हे सगळे शब्द प्राचीन जीवन पद्धतीला अनुसरून आले आहेत. हा कुठलाही शब्द पूजा पद्धतीशी संबंधित नाही. आमच्या संस्कृतीने एक भारतीय जीवन पद्धती तयार केलेली आहे. ज्या जीवन पद्धतीला हिंदू असे म्हटले आहे.