रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ संचलित, भैरूरतन दमाणी अंधशाळा (निवासी) सोलापूर येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे (माजी) मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीपजी स्वामी साहेब यांनी शाळेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी वसती गृह व शाळा इमारतीची पाहणी करण्यात आली येथील परिसर सुंदर असल्याचे त्यांनी नमूद केले. हातमाग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांची राहणीमान इतर सोयी सुविधा, स्वयंपाक गृह यांची माहिती जाणून घेतली त्यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी गायत्री कारभारी व तिच्या सहकार्याने पाहुण्यांचे स्वागत सुमधुर आवाजाने गीत सादर करून केले.
यानंतर गायत्री पेदंती, विलास बनसोडे व श्रद्धा लंगोटे यांनी “ईश्वर सत्य आहे सत्य ही शिव है” आणि इतर सदाबहार हिंदी गाणे सुद्धा सादर केली. या गायन कार्यक्रमात दिलीपजी स्वामी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन कार्यक्रमात तल्लीन झाल्याचे दिसून आले. प्रकाश दर्शनाळे मुख्याध्यापक यांनी संस्थेचा परिचय करून दिला. तसेच त्यांनी शाळेचा थकीत वेतनेतर अनुदान आणि विद्यार्थी वाढ होऊन मिळण्यासाठी सहकार्य करावे असे प्रतिपादन केले. त्यानंतर श्री.दिलीपजी स्वामी यांनी सुद्धा गीत रामायणातील गीत सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिलीपजी स्वामी यांनी या अंध शाळेकरीता आणि मूकबधिर शाळेकरिता जे सहाय्य शासनाच्या माध्यमातून करता येईल ते नक्की करू असे प्रतिपादन केले. तसेच या विद्यार्थ्यांना अंधत्व असून ते डोळस आहेत आणि ज्यांच्याकडे केवळदृष्टी आहे परंतु दृष्टिकोन स्वच्छ नाही असे हे ते म्हणाले. आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे त्यांनी मनापासून कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले भविष्यात आपल्याला कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यावर मात करण्याची तुम्हाला शक्ती परमेश्वराने यापूर्वीच दिलेले आहे असेही त्यांनी सांगितले.
आयुष्यातील सर्व दुःख विसरून त्यावर मात करून आपली वाट चालताना ज्या कठीण प्रसंगांना सामोरं जावे लागते त्या प्रसंगातूनच मानवी जीवन घडते असे त्यांनी प्रतिपादन केले. या रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ तर्फे चालवल्या जाणाऱ्या या शाळेच्या सर्व कर्मचारी, शिक्षक आणि संस्था संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी मा.स्वामी साहेब यांचा संस्थेतर्फे शाल, स्मृतिचिन्ह व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी रोटेरियन जानवी माखीजा, संचालक दमानी अंधशाळा, सुनील दावडा सचिव राधाकिसन फोमरा मूकबधिर विद्यालय आणि संस्थेचे सचिव संतोष भंडारी हे उपस्थित होते. सचिव संतोष भंडारी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.