सोलापूर : प्रतिनिधी : डिजिटल पत्रकारिता ही नव्या युगाची पत्रकारिता आहे. वेगवेगळ्या आशय प्रकारांतील माहितीचे एकत्रीकरण, पृथ्थकरण आणि प्रसारण करण्याची क्षमता असलेल्या डिजिटल पत्रकारितेला उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिझमचे प्रा. योगेश बोराटे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, कौशल्य विकास केंद्र, सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या “सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल जर्नालिझम” या कौशल्याधारित कोर्सला शनिवारी सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे होते. मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी या कोर्सचे समन्वयक डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
प्रा. योगेश बोराटे पुढे बोलताना म्हणाले की, डिजिटल पत्रकारितेत मुद्रित माध्यम व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा मिलाफ आहे. हे माध्यम नव्या पिढीसह सर्वांच्याच आवडीचे झाले आहे. इन्फोग्राफिक्स, पॉडकास्टिंग, डेटा जर्नालिझममुळे हे माध्यम अधिक सशक्त बनले आहे. या माध्यमाद्वारे वाचकांच्या आवडी-निवडी कळतात. आपले वाचक किती वेळ बातमी वाचू शकतात याचाही अंदाज येवू शकतो. ओटीटी प्लॅटफॉर्म व डिजिटल माध्यमांबाबतची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार असल्याचे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. ही डिजिटल माध्यमांसाठी सकारात्मक बाब आहे. सरकारच्या मान्यतेचा मार्ग यामुळे सुकर होणार आहे. डिजिटल पत्रकारिता करणा-या व करु इच्छिणा-या पत्रकारांनी आपल्यातील कौशल्ये विकसित करावीत. कंटेट प्लॅनिंग यासाठी महत्त्वाचे राहील. आगामी काळात ही डिजिटल माध्यमे समाजाचा अविभाज्य भाग बनून माहितीचे आदान-प्रदान करतील.
यावेळी बोलताना सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, मास कम्युनिकेशन विभाग हा सतत गतीशील असणारा व नव्या पिढीचे पत्रकार घडविणारा विभाग आहे. या विभागात विद्यापीठाकडून मोठी आर्थिक तरतूद असणारा टीव्ही व रेडिओ स्टुडिओ उभा केला जात आहे. हे काम काही दिवसांतच पूर्ण होऊन तो कार्यरत होईल. डिजिटल पत्रकारितेची समाजाला गरज आहे. जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावरची पत्रकारिता याद्वारे केली जाऊ शकते. हा कौशल्याधारिता कोर्स सुरु झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी उपलब्धी आहे. इच्छुकांचा या कोर्सला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्यातून या कोर्सचे महत्त्व स्पष्ट होते.
मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर म्हणाले की, भारतीय पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. काळाच्या अोघात पत्रकारिता बदलली आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेत आमुलाग्र बदल झाले आहेत. वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही पत्रकारितेनंतर आता डिजिटल पत्रकारितेचे युग सुरु झाले आहे. डिजिटल पत्रकारितेत करिअरच्या चांगल्या संधी आहेत. या कोर्सच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व कौशल्ययुक्त पत्रकार निश्चितपणे घडतील, यात शंका नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भासके यांनी केले. गुगट मिटद्वारे ऑनलाईन स्वरुपात हा कार्यक्रम झाला.
‘अँकरिंग कोर्स’च्या विद्यार्थ्यांना अरविंद जोशी यांचे मार्गदर्शन
ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी अँकरिंग या सर्टिफिकेट कोर्सच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अँकरिंग करणे ही एक कला आहे. या कोर्सद्वारे आपल्यातील कलागुण व्यक्त करण्याची संधी प्राप्त होत असल्याचे सांगत त्यांनी विविध प्रकारच्या अँकरिंगबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘अँकरिंग’ व ‘शॉर्टफिल्म/डाॅक्युमेंट्री’ या कोर्ससाठी प्रवेशाची संधी
विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाकडूनच डिजिटल जर्नालिझम सोबतच ‘अँकरिंग’ व ‘शॉर्टफिल्म/डाॅक्युमेंट्री’ हे सहा महिने कालावधीचे कोर्स चालविले जातात. ‘अँकरिंग’ व ‘शॉर्टफिल्म/डाॅक्युमेंट्री’ या कोर्सच्या मोजक्यात जागा शिल्लक असून कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-यांनी कु. तेजस्विनी कांबळे (अँकरिंग कोर्स : मो-98600 67388) व डॉ. अंबादास भासके (शॉर्टफिल्म/डॉक्युमेंट्री कोर्स : मो-98228 83978) यांच्याशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी केले आहे.