उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात अनेक दिवसांपासून तणाव सुरु आहे. तणावाचे कारण म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील जवळीक. उत्तर कोरिया याला धोका मानत आहे.
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन युद्धाचं रणशिंग फुंकणार असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढताना दिसत आहे. उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील युद्धाची शक्यता पुन्हा निर्माण होऊ लागली आहे. दोन्ही देशांमध्ये मागील बराच काळ तणाव सुरु आहे. दरम्यान शनिवारी (18 मार्च) उत्तर कोरियाने दावा केला की, उत्तर कोरियातील सुमारे 8,00,000 नागरिकांनी अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी देशाच्या सैन्यात सामील होण्यासाठी स्वेच्छेने सामील झाले आहेत.
हुकूमशाह किम जोंग युद्धाचं रणशिंग फुंकणार?
उत्तर कोरियाकडून वाढत्या धोक्यांना तोंड देण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकन सैन्याने संयुक्त युद्धाभ्यासाला सुरुवात केली आहे. याविरोधात चिथावणीखोर इशारा देण्यासाठी उत्तर कोरियानेही क्षेपणास्त्र चाचणी केली. उत्तर कोरियाने पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. यावेळी हुकूमशाह किम जोंगने इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला. एका आठवड्यात उत्तर कोरियाने तीन वेळा मिसाईल टेस्ट केली आहे. त्यामुळे हुकूमशाह किम जोंग उन युद्धाच्या तयारीत आहे की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
आठ लाख नागरिक सैन्यात भरती होण्यासाठी तयार
उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तपत्राने शनिवारी ही माहिती दिली. रॉडॉन्ग सिनमुन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, उत्तर कोरियातील आठ लाख नागरिक सैन्यात भरती होऊन अमेरिकेविरोधात लढण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेचा सामना करण्यासाठी देशभरातील सुमारे 8,00,000 विद्यार्थी आणि कामगारांनी शुक्रवारी उत्तर कोरियाच्या सैन्य दलात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अमेरिकेची दक्षिण कोरियाशी जवळीक तणावाचं कारण
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात अनेक दिवसांपासून तणाव सुरु आहे. या तणावाचं कारण म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वाढती जवळीक. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील वाढत्या संबंधांना उत्तर कोरिया धोका मानत आहे. याला उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनचा विरोध आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि दक्षिण कोरिया वेळोवेळी संयुक्त लष्करी सरावही करतात. हे पाहता उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांनी अनेकवेळा अमेरिकेला थेट युद्धाची धमकी दिली आहे.
अलिकडेच, उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सुरु असलेल्या लष्करी सरावांना प्रत्युत्तर म्हणून ह्वासाँग-17 इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागलं आहे. याआधीही उत्तर कोरियाने यावर्षी अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रं डागली होती.