येस न्युज नेटवर्क । मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे वृद्धापकाळानं ह्रदय बंद पडून त्यांचं निधन झालं. गुलाटी यांच्या निधनामुळे भारताने एक अनुभवी आणि यशस्वी उद्योजक गमावल्याची भावना समाज माध्यमांवर उमटत आहे.
महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात ‘एमडीएच’ मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘महाशियां दी हट्टी’ ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी ‘एमडीएच’ या नावाने प्रसिद्ध आहे.