जिल्हा प्रशासन आणि सेरेंटिका एनर्जीच्यावतीने कौशल्य विकास प्रशिक्षणाला सुरूवात
धाराशीव : (प्रतिनिधी) धाराशीव जिल्ह्यात हरित उर्जा क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. भविष्य काळात या क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ तरूणांनी घ्यावा यासाठी कौशल्य विकासाचा कालबद्ध कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. याच कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाअंतर्गत वाशी तालूक्यातील तरूणांना हरित उर्जा क्षेत्राशी संबंधित प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण देण्यात आले आहे. धाराशीवचे पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
धाराशीव जिल्हा हा येत्या काळात हरिज उर्जेचे हब बनू पाहत आहे. हरित उर्जा क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधी या स्थानिकांना मिळाव्यात या हेतूने जिल्हा प्रशासन आणि सेरेंटिका रिन्यूएबल इनर्जी या कंपनीने पुढाकार कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भविष्यकाळात उपलब्ध होणारे रोजगार हे स्थानिक तरूणांना मिळावेत यासाठी आवश्यक असणारे प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि सेरिंटिका इनर्जी यांच्या पुढाकारातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी यांच्या वतीने वाशी तालूक्यातील तरूणांना प्रशिक्षण देण्यात आले.
नव्याने उदयास येत असलेल्या हरित उर्जा क्षेत्रात स्थानिक तरूणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी त्यांना या क्षेत्राशी संबंधित असलेले प्राथमिक ज्ञान मिळावे म्हणून वाशी तालूक्यातील 20 तरूणांची निवड करून त्यांना इलेक्ट्रिकलशी संबंधित शिक्षण देण्यात आले. सेरेंटिका रिन्यूएबल इनर्जी या संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण मोफत देण्यात आले आहे. वाशी तालूक्यातील स्थानिक 20 तरूणांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून नूकतेच त्यांना प्रमाणपत्राचे वाटप देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये धाराशीवचे पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रशिक्षण घेतलेल्या तरूणांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
पर्यावरणीय आणि हवामान बदल या विषयावर संपूर्ण जगात विचार मंथन सुरू आहे. याच विषयाच्या अनुषंगाने भारतामध्ये हरित उर्जा क्षेत्राला अनन्य साधारण महत्व दिले जात आहे. सध्या गुजरात हे राज्य यामध्ये आघाडीवर आहे. महाराष्ट्रालाही यात मोठी संधी आहे आणि त्यात धाराशीव जिल्हा हा आघाडीवर असणार आहे. त्यामुळे भविष्यात हरित उर्जा क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ स्थानिक तरूणांनी घेण्यासाठी या क्षेत्रातील कौशल्य विकसीत करून त्या संबधीचे ज्ञान घेतल्यास स्थानिकांना यामध्ये संधी मिळण्यास वाव आहे.