बीड : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गहिनीनाथ गडावर महापूजा केली. त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेही गहिनीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुंडे बहीण-भावाला एकाच व्यासपीठावर पाहण्याचा योग येणार आहे. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडावर महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे.
धनंजय मुंडेंनी गहिनीनाथ गडावर जाण्याची परंपरा अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरु आहे. यंदा ते मंत्री तर आहेतच, मात्र वैयक्तिक आयुष्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळेही ते चर्चेत आहेत. यावेळी गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
धनंजय मुंडेंचा जनता दरबार
धनंजय मुंडे दुपारी अडीच वाजल्यापासून बार्शी रोड येथील राष्ट्रवादी भवन जनता दरबारात कार्यकर्ते आणि नागरिकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर बार्शी रोड येथील भगवानबाबा प्रतिष्ठान येथे भेट आणि काही नियोजित भेटीगाठी आटोपून ते परळीकडे रवाना होणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.