महिला वर्गातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया : सोशल मीडियावर होत आहे व्हायरल
सोलापूर : शहर मध्ये विधानसभा निवडणुकीत मतदारांसमोर जाताना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी समस्त लाडक्या बहिणींना उद्देशून एक अनोखे भावनिक पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून महिला वर्गातून या पत्राला अतिशय सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळत आहेत.
भाजपा आणि महायुतीचे शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी समस्त महिला भगिनींना उद्देशून लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे –
आदरणीय लाडक्या बहिणीला देवेंद्र दादाचा नमस्कार ! बहिण भावाचे नाते शब्दांतून नव्हे तर कृतीतून व्यक्त होणारे नाते असते. कोणत्याही कठीण प्रसंगात बहिणीच्या मदतीला धावून जातो तोच खरा भाऊ. खरं सांगू का ताई, बहीण हे आईचंच दुसरं रूप असतं. तिचा सन्मान करणं हे प्रत्येक भावाचं कर्तव्यच ! म्हणूनच लाडक्या बहिणीला दर महिन्याला १५०० रुपयांची भेट देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला तेव्हा ती रक्कम सगळ्या बहिणींपर्यंत पोहोचावी यासाठी मी जीवापाड प्रयत्न केले. जात-पात, धर्म असा भेद न करता सगळ्या बहिणींच्या ओटीत मदतीची ओंजळ रिती केली. रात्रंदिवस आपल्या परिवारासाठी राबणाऱ्या बहिणीला चार पैसे मिळावेत, कुटुंबातला तिचा मान वाढावा, तिने स्वतःच्या आवडीनिवडी जपाव्यात, आरोग्याकडे लक्ष द्यावं हाच त्यामागचा हेतू होता. दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणीला दिलेली ही भाऊबीजच !
आपलं नातं हे नातं असंच अनंतकाळ टिकावं यासाठी आता मला बहिणीच्या स्नेहाची, प्रेमाची आणि मायेची गरज आहे. संत ज्ञानेश्वरांच्या मागं जशी मुक्ताई होती तशी या देवेंद्र दादाच्या मागे त्याला मतदान करणारी लाडकी बहीण असेल याची खात्री आहे. ताई मला मतदान करणं म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करणे होय. लाडकी बहीण आणि आदर्श दादा असे हे आपलं नातं अखंड अतूट ठेवण्यासाठी तुझा मतदानरुपी आशीर्वाद कायम माझ्या मस्तकावर असू द्यावा हीच कळकळीची प्रार्थना !
लाडक्या बहिणींचा हक्काचा दादा देवेंद्र राजेश कोठे.
लाडक्या बहिणीला लिहिलेल्या पत्रातून भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी महिला भगिनींना मतदानरुपी मदतीची हाक दिली आहे. त्यांचे हे पत्र सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
राज्यात महायुती सरकार पुन्हा आल्यानंतर महिलांना दरमहा १५०० रुपयांऐवजी दरमहा २१०० मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच केली आहे. या घोषणेबाबतही अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया विशेषतः महिलांकडून व्हाट्सअप, फेसबुकवर नोंदविल्या जात आहेत. तर सोशल मीडियावरील या पत्राच्या पोस्टवर अनेक महिला तसेच पुरुषांनी या पत्राचे स्वागत केले आहे. लाडकी बहीण योजनेद्वारे हजारो महिलांना दरमहा १५०० रुपये मिळवून देणाऱ्या देवेंद्र कोठे यांचे कौतुक नेटकरी करीत आहेत.