तब्बल ३ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या यादीचे वाचन : अडचणींचे तत्काळ निराकरण
सोलापूर :
‘आमदार आपल्या भेटीला’ उपक्रमातून देवेंद्र कोठे यांनी रविवारी शेकडो नागरिकांच्या थेट भेटी घेतल्या. विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी तिसऱ्यांदा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला.
आमदार आपल्या भेटीला उपक्रमात रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील राजीव नगर, किसान नगर मुख्य रस्ता, विष्णुपंत नगर, गंगाधर नगर, तुळशांती नगर, तुळजाभवानी नगर, फैज दवाखाना ते समाधान नगर रस्ता तसेच अभिषेक नगर बुद्ध मंदिर ते वेलकम हॉल रस्त्याची परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसमवेत दुचाकीवर फिरून पाहणी केली.

शहर मध्य मतदारसंघासाठी शासनाच्या २०२४ – २५ च्या निधीतून आमदार देवेंद्र कोठे यांनी १२ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतून वरील परिसरातील अनेक रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यातील तब्बल ३ कोटी रुपयांची कामे प्रभाग क्रमांक ११ च्या परिसरात करण्यात येणार आहेत.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, प्रभाग क्रमांक ११ मधून माजी महापौर स्व. महेश कोठे, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिता रामदास मगर यांना नागरिकांनी नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. या काळात त्यांनी परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. परंतु मागील पंधरा वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक ११ आणि परिसरातील नागरिकांना विकासाच्या बाबतीत वनवास भोगावा लागला आहे. हा परिसर विकासकामांपासून सुमारे दोन दशके वंचित राहिल्यामुळे या भागाला भरघोस निधी देण्याचा निश्चय केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझे राजकीय पालकत्व स्वीकारल्यामुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे या परिसराला सर्व सोयीसुविधा देण्याकरिता प्रभाग क्रमांक ११ आणि परिसरासाठी आगामी पाच वर्षात २५ कोटी रुपयांचा निधी देऊ, असेही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले.
याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राजकुमार हंचाटे, रामदास मगर, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, मनोज कलशेट्टी, संगीता खंदारे, अप्पू कडगंची, चन्नया हिरेमठ, गणेश माळी, विश्वनाथ प्याटी, गिरीश कोटा, सिद्धेश्वर कमटम, अभिषेक चिंता, प्रभाकर गंपले, गणेश चौटे, संगप्पा बबलाद, व्यंकटेश कोळी, संजय चव्हाण, विलास बनसोडे, युवराज बाळशंकर, संजय पाटील, बालाजी मोहिते, अमोल उपाडे, लखन चव्हाण, भीमाशंकर कुंभार, पवन कोळी, सिद्धू प्याटी, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
काँग्रेसला मतदान करून चूक केली
गेल्या १५ वर्षांपासून ते आम्ही काँग्रेसला मतदान करत आहोत. परंतु काँग्रेसने आमच्या परिसरात काहीही काम केले नाही. त्यामुळे आगामी काळात आम्ही आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्याच पाठीशी उभे राहणार आहोत असे मत किसान नगरातील शौकत शेख यांनी व्यक्त केले.
सबका साथ सबका विकास हेच धोरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे संपूर्ण शहर मध्य मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहर मध्य मतदारसंघाच्या विकासासाठी लागेल तितका निधी शासनाकडून खेचून आणू.