सोलापूर, (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी संवाद साधून पुढे निघाले त्याचवेळी सातरस्ता परिसरातील वर्षा बंगल्यावर अचानकपणे त्यांनी ताफा थांबवला आणि कार्यकर्ता असलेल्या अनंत जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. ताफ्यातील कोणालाच काही कळेना आणि या अचानक भेटीचे गुपीत मात्र गुलदस्त्यातच राहिले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधुम सुरू असल्याने राज्यातील कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रचारासाठी सोलापूरमध्ये दाखल होत आहेत. आपापल्या उमेदवारांचा प्रचार करून ते पत्रकारांशी संवाद साधून आपल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही करीत आहेत. त्यातच मंगळवार दि. 24 नोव्हेंबर रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा ठरला होता. भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी, बैठका घेवून त्यांनी उमेदवारांचा प्रचार केला आणि सकाळी ठरल्याप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकारांशी संवाद साधून ते पुढील नियोजित दौऱ्यासाठी हेरिटेज लॉन मधून पंढरपूरकडे सातरस्ता मार्गे निघाले त्यांचा ताफा सातरस्ता चौक परिसरातून रेल्वेस्टेशन मार्गे पुढे जाणार असे नियोजित होते तशा सूचनाही पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या. परंतु फडणवीस यांचा ताफा सातरस्ता चौकातून अचानकपणे महाराणा प्रताप यांचा पुतळा असलेल्या समोरच्या बोळात घुसला. सोलापूचे माजी खासदार अॅड शरद बनसोडे यांचा परंतु सध्या माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या मालकीचा असलेला वर्षा नावाचा बंगला या परिसरात आहे. त्या वर्षा नावाच्या बंगल्यात देवेंद्र फडणवीस यांची गाडी घुसली. दौऱ्यातील आणि ताफ्यातील सहभागी नेते पदाधिकाऱ्यांना तसेच पोलीसांना याबाबत काहीच कळेना अचानकपणे फडणवीसांची गाडी इकडे कशी आली हा विचार करीत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी थेट वर्षा बंगल्यात प्रवेश केला त्यावेळी माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. नेता कार्यकर्त्याच्या घरी आल्याचा आनंद व्यक्त करून अनंत जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पुष्पगुच्छ, शाल देवून सत्कार केला. यावेळी माजी मंत्री आमदार विजय देशमुख, परिवहन माजी सभापती गणेश जाधव, नगरसेवक अविनाश पाटील, अमर पुदाले, अभिनव अनंत जाधव, रोहित जंगम, अतुल लोंढे, ज्ञानेश्वर शिरसट, अप्पा बुरांडे, रवि गायकवाड उपस्थित होते. चहापान झाल्यावर अनंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर लगेच ते पंढरपूरच्या नियोजित दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले.
अवघ्या काही वेळाच्या या घडामोडीने देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील भाजपाच्या स्थानिक नेत्यांच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या भुवया मात्र उंचावल्या होत्या. अनंत जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी चर्चा काय झाली याचा विचार करीत पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले असावेत.
सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्यासाठीच सदिच्छा भेट – अनंत जाधव
मी भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्याला बळ मिळावे म्हणूनच देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या घरी येवून सदिच्छा भेट दिली. पक्ष वाढवण्यासाठी काम करीत राहा आम्ही आहोत तरूणांना यापुढे चांगली संधी आहे असे आशिर्वादही त्यांनी यावेळी दिल्याचे अनंत जाधव यांनी सांगितले.