प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांसह राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले आभार
मुंबई : राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आणखी काही दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेचे तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 26 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्विट करुन त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने ते रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती दिली होती. सात दिवसांच्या उपचारानंतर आज उपमुख्यमंत्र्यांना घरी सोडण्यात आले असून पुढील काही दिवस ते विलगीकरणात राहणार असून कार्यालयीन कामकाज घरुनच करणार आहेत. महत्वाच्या बैठकांना देखिल उपमुख्यमंत्री व्हीसीद्वारे उपस्थित असतील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.