सोलापूर : प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना आता डेंग्यूच्या सर्व्हेची ड्यूटी करावी लागणार आहे. शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने शिक्षक आणि आशा सेविकांच्या माध्यमातून घरोघरी कंटेनरसर्व्हे केला जाणार आहे. एकावेळी 248 शिक्षकांना ड्यूटी दिली जाणार असून, त्या संदर्भातील आदेश आज काढले जाणार आहेत.
कोरोनाची ड्यूटी करताना काही शिक्षकांना जीव गमवावा लागला तर 37 पेक्षा अधिक शिक्षकांना कोरोनाची लागण झाली. ऑनलाइन शिक्षण देत असतानाच दुसरीकडे त्यांना कोरोना ड्यूटी करावी लागली. कोरोना कमी झाल्याने शिक्षकांना कोरोना ड्यूटीतून सुटी मिळाली. परंतु, काही दिवसांतच त्यांना पुन्हा डेंग्यू सर्व्हेची नवीन ड्यूटी करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. पहिल्यांदा 248 शिक्षकांना आठवड्यासाठी ड्यूटी दिली जाणार आहे. त्यानंतरही सर्व्हे सुरू राहिल्यास टप्प्या- टप्प्याने नवीन तेवढ्याच शिक्षकांची नियुक्ती दिली जाईल, असे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केले.