सोलापूर :- नैसर्गिक संकटाला समोर जाण्यासाठी तसेच जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी गुरुवार दि.24 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील करमणूक शाखेच्या इमारतीमध्ये आपत्ती व्यवस्थापनतंर्गत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये होणारे अथवा होऊ न शकणारे भूकंप या नैसर्गिक आपत्ती विषयक दि. 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापनतंर्गत प्रात्यक्षिके घेण्यात आले.
यामध्ये दिनांक 23 रोजी सकाळी 10.30 वा. शिव छत्रपती, रंगभवन, सोलापूर येथे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या सर्व शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी चर्चासत्र व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अति.आरोग्य अधिकारी डॉ. पिंपळे यांनी सोलापूर जिल्ह्याची आपत्ती विषयक पार्श्वभूमी सांगितली.
तसेच दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील करमणूक कर शाखेमध्ये एनडीआरएफ, पुणे यांचे मार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये इमारत ढासळली आणि एका इमारतीला आग लागली तर त्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ च्या पथकाने ने तत्परता दाखवून वाचवलं, आणि जखमींवर मलमपट्टी करून त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला नेण्यात आले,याबाबत संकटकालीन बचावचे प्रात्यक्षिक (मॉकड्रील) केले.
कोणतीही आपत्ती आल्यास एनडीआरएफ चे पथक तात्काळ दाखल होऊन आपत्तीत अडकलेल्या नागरीकांना वाचवत असते. हे कार्य एनडीआरएफ चे जवान अत्यंत वेगाने करते, असे एनडीआरएफचे अधिकारी सुशांतकुमार शेट्टी आणि अग्निशमन दल प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले.
या प्रात्यक्षिक वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, महसूल तहसिलदार श्री.मोहाळे, तहसीलदार अंजली मरोड, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अश्विनी भोसले, उदयसिंग पाटील, अग्नीशामक दल प्रमुख केदार आवटे उपस्थित होते.