सोलापूर : डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन तर्फे महापालिका प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या नियोजनशून्य कारभारामुळे दगावलेल्या समर्थ धोंडीबा भास्कर याच्या कुटुंबियांना स्मार्ट सिटी कडून ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी. तसेच कंत्राटदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा , या मागणीसाठी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने महापालिका प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात आली. समर्थ भास्कर यांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . जिल्हा सचिव अनिल वासन यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने व परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलन करणा-या २५ ते ३० युवकांना ताब्यात घेतले.