येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. सरकारने पाठवलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर शेतकरी संघटना काहीशा नरमल्याचं दिसतंय. सरकारच्या चर्चेचा प्रस्तावर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी स्वीकारला आहे. शेतकरी नेत्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजताची चर्चेसाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील विज्ञान भवनात ही बैठक होईल. यापूर्वी, सरकारने शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन करत आपल्या सोयीनुसार वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यास सांगितलं होतं.
गेल्या एक महिन्यापासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर हजारो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरूद्ध आंदोलन करत आहेत. आता शेतकरी संघटनांनी शनिवारी सरकारशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. आम्ही २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता चर्चेसाठी केंद्र सरकारसमोर प्रस्ताव ठेवतो, असं स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी शेतकरी नेत्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.